उन्हाळ्यात तिळाची विक्रमी वाढ! हेक्टरी ८ क्विंटल उत्पादन मिळवण्याची खास पद्धत
Sesame Production: तिनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या तिळाचे उत्पादन हे उन्हाळ्यात जास्त चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतं. तिळाचे हेक्टरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळविण्यासाठी तिळाच्या कोणत्या जाती वापरायच्या, बीजप्रक्रिया कोणती करायची, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या विषयी सविस्तर माहिती घेऊया.
हवामान : तिळाची चांगली उगवण १५ अंश सेल्सिअस या किमान तापमानात होते. पिकांच्या कायिक वाढीसाठी २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. तीळ पिकाच्या फूल आणि फळधारणेसाठी २६ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान उत्तम मानले जाते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते.
जमीन : वाळूमिश्रित पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकाची चांगली वाढ होते. त्याचप्रमाणे सुपीक आणि उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ इतका असावा. निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनीत तिळाचे पीक चांगले वाढत नाही.
पूर्वमशागत : तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन तयार करताना भुसभुशीत करावी. तीळ पिकासाठी जमिनीची मशागत करताना नांगरट करणे टाळावे. नांगरणीऐवजी उन्हाळ्यात उभी-आडवी वखरणी करून शेवटच्या वखरणीच्या वेळी एकरी साधारणतः सहा ते आठ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकावे. ते जमिनीत मिसळून जमीन चांगली भुसभुशीत करावी. काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. पठाल फिरवून पेरणी करावी.
पेरणीची वेळ : उन्हाळी तिळासाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी
करता येते.
सुधारित जाती
हे पीक हवामानातील विविध घटकांस अतिशय संवेदनशील असल्यामुळे विभाग व हंगामनिहाय शिफारशीत वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी. उन्हाळी तिळासाठी फुले पूर्णा, ए.के.टी.- १०१ या वाणांची लागवड करावी.
पेरणीची पद्धत : पेरणीच्या पद्धतीचा थेट परिणाम तिळाच्या उत्पादनावर होतो. पेरणीसाठी उत्तम प्रतीचे ४ ते ५ किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होते. पेरणी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर पाभरीने करावी. पाभरीने पेरणी करत असताना बारीक वाळू किंवा चालून घेतलेले गांडूळ खत किंवा शेणखतात मिसळून बियाणे पेरावे. बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होऊन एकसारख्या प्रमाणात पडते. पेरणी ४५ सें.मी. अंतरावर असल्यास ओळीतील दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून विरळणी करावी. पेरणी ३० से.मी. अंतरावर केली असल्यास विरळणी १५ सें.मी. अंतर ठेवून करावी. विरळणी पेरणीनंतर २१ दिवसांनी करावी. २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो म्हणून योग्य ती काळजी घ्यावी.
बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बियाण्यांस तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतून उद्भविणाऱ्या रोगांना आळा बसतो. बियाण्याची उगवण चांगली होते.
खत व्यवस्थापन : ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी जमिनीत शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले मिसळून घ्यावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी नत्राचा अर्धा हप्ता २५ किलो नत्र देऊन पाणी द्यावे. अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत युरिया (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
आंतरमशागत : उन्हाळी तिळाच्या पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरून घ्यावेत. उन्हाळी तीळ पेरणीनंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी पहिली व त्यानंतर आठ दिवसांनंतर दुसरी विरळणी करावी. दोन तीळ रोपांतील अंतर दहा ते पंधरा सेंटिमीटर आणि रोपांची एकरी संख्या जवळपास एक लाखापर्यंत राहील याची काळजी घ्यावी. उन्हाळी तीळ पिकात आवश्यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या किंवा खुरपण्या द्याव्यात. निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे. सुरुवातीच्या एक महिन्याच्या काळात उन्हाळी तिळाचे पीक तणविरहित राहील याची काळजी घ्यावी.
पाणी व्यवस्थापन: मुख्यतः फुले येण्याच्या कालावधीत नवे बोंड्या भरण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. गरजेप्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाल्या द्याव्यात. तीळ पिकास जमिनीच्या मगदुरानुसार सरासरी ५ ते ६ पाण्याच्या पाल्या पुरेशा होतात.
अशा प्रकारे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळी हंगामात ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
हे पण वाचा : कांदा बाजारभावाचे भवितव्य: पुढील महिन्यात काय घडू शकते?