Agristack- ॲग्रिस्टॅक योजनेवरील बहिष्कार अंशतः मागे – कृषी सहाय्यकांचा निर्णय आणि त्यामागील कारणे
शेतकऱ्यांना ओळख क्रमांक (Farmer ID) देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रिस्टॅक योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे घेतला आहे. यामुळे आता कृषी सहाय्यक शेतकऱ्यांची नोंदणी न करता त्यांना प्रोत्साहन देण्याचे आणि सामाईक सुविधा केंद्रांपर्यंत (Common Service Centers – CSC) पोहोचविण्याचे काम करणार आहेत.
बहिष्कार का टाकण्यात आला?
ही योजना तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी या योजनेच्या अंमलबजावणीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे तलाठ्यांवर सगळी जबाबदारी आली आणि नोंदणीचा वेग कमी झाला.
तलाठ्यांवरील ताण लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने सामाईक सुविधा केंद्रांना (CSC) यामध्ये सहभागी करून घेतले. त्यामुळे शेतकरी आता या केंद्रांवर जाऊन स्वतःची नोंदणी करू लागले आणि तिथूनच त्यांना ओळख क्रमांक मिळू लागला.
बहिष्कार का मागे घेतला?
कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी घेतलेल्या भूमिकेबाबत राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी सहाय्यक संघटनेशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. agristack
कृषी सहाय्यक संघटनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या होत्या:
1.नोंदणीसाठी लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन द्यावे – तलाठ्यांप्रमाणेच कृषी सहाय्यकांनाही तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेही नोंदणी प्रक्रिया करू शकतात.
2.”कृषी सहाय्यक” हे पदनाम बदलून “ग्राम कृषी अधिकारी” करावे – पदनामात सुधारणा करून जबाबदारी अधिक स्पष्ट करावी.
राज्य सरकारने पंधरा दिवसांत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कृषी सहाय्यकांनी बहिष्कार अंशतः मागे घेतला.
आतापुढील प्रक्रिया काय?
– कृषी सहाय्यक नोंदणी प्रक्रिया थेट करणार नाहीत पण शेतकऱ्यांना CSC केंद्रांवर जाण्यास प्रवृत्त करणार आहेत.
– सरकारने लॅपटॉप आणि इंटरनेट सुविधांबाबत तोडगा काढल्यास कृषी सहाय्यक पुन्हा नोंदणी प्रक्रियेत सक्रिय होऊ शकतात.
– मागण्या पूर्ण झाल्यास कृषी सहाय्यकांचा संपूर्ण बहिष्कार मागे घेतला जाऊ शकतो.
यामुळे शेतकऱ्यांना Farmer ID मिळण्याची प्रक्रिया गती घेईल आणि ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीत सुलभता येईल.
हे पण वाचा : केमिकल मुक्त टरबूज ओळखा आणि सुरक्षित खरेदी करा! agristack