cci-kapus- CCI कडून कापसाची विक्री; कापूस दरात झाला मोठा बदल?
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाची ई लिलावाद्वारे विक्री सुरु केली. मात्र सीसीआयने आधार किंमत जास्त ठेवल्याने खेरदीदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तसेच भाव जास्त राहील्याने बाजारावरही त्याचा दबाव आला नाही. सीसीआयने विक्रीचे भाव बाजारभावापेक्षा कमी ठेऊ नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
सीसीआयने २०२३ आणि २०२४ मध्ये खरेदी केलेल्या कापसाची विक्री बुधवार (ता. ५) पासून सुरु केली. सीसीआयने ६ लाख २ हजार ३०० गाठी कापूस विक्रीसाठी निविदा काढल्या होत्या. मात्र त्यापैकी केवळ ७ हजार १०० गाठीच विकल्या गेल्या. यापैकी ६ हजार ८०० गाठी मिल्सनी खरेदी केल्या, तर ३०० गाठी कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला. सीसीआयच्या पहिल्या ई लिलावासाठी खूपच कमी प्रतिसाद मिळाला. त्याचे कारण म्हणजे सीसीआयने कापूस विक्रीची आधार किंमत जास्त ठेवली होती. त्यामुळे खरेदीदारांनी या विक्रीकडे पाठ फिरवल्याचे दिसते.
सीसीआयने देशभरात आतापर्यंत जवळपास ९४ लाख गाठी कापूस खरेदी केला. सध्याही अनेक भागात खरेदी सुरु आहे. सीसीआयची सर्वाधिक खरेदी तेलंगणात झाली. तेलंगणात ४० लाख गाठींपेक्षा जास्त कापसाची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात २८ लाख गाठींची खरेदी पूर्ण झाली. गुजरातमध्येही ११ लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला. इतर राज्यांमध्येही यंदा चांगली खरेदी झाल्याचे, सीसीआयने स्पष्ट केले.
सीसीआयचे भाव जास्त
सीसीआयने यंदाच्या आपल्या पहिल्याच लिलावत कापूस विक्रीचा आधार भाव बाजारभावापेक्षा जास्त ठेवला होता. सध्या कापूस खंडीचे भाव बाजारात कापूस धाग्याची लांबी आणि गुणवत्तेनुसार ५२ हजार ते ५४ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र सीसीआयने विक्रीचा आधार भाव ५४ हजार ते ५५ हजार ५०० रुपये ठेवला होता. सीसीआयचा कापूस विक्रीचा भाव जास्त असल्याने खुल्या बाजारातील भावावर याचा परिणाम जाणवला नाही. सीसीआयने नाफेडप्रमाणे कमी भावात विक्री केली असती तर बाजारावर दबाव वाढून दर कमी झाले असते. पण सीसीआयने पहिल्या विक्रीत तरी तसे केले नाही.cci-kapus
भाव कमी करू नये
देशात सध्या सीसीआयकडेच कापसाचा जास्त साठा आहे. देशात यंदा ३०० लाख गाठींच्या दरम्यान उत्पादनाचा अंदाज आहे. त्यापैकी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत देशातील बाजारात २१६ लाख गाठी म्हणजेच ७२ टक्के कापूस आला. त्यापैकी ९४ लाख गाठी म्हणजेच बाजारात आवक झालेल्या एकूण आवकेपैकी तब्बल ४४ टक्के कापूस सीसीआयने खरेदी केला. म्हणजेच सीसीआयच्या कापूस विक्रीचा बाजारावर लगेच परिणाम होत आहे. त्यामुळे सीसीआयने कापसाची विक्री कमी भावात करू नये. सीसीआयने विक्री बाजारभावापेक्षा कमी दरात केली नाही तर दर टिकून राहण्यास मदत होईल, असे अभ्यासकांनी सांगितले.cci-kapus
हे पण वाचा : gahu-sathavanuk-गव्हाची साठवणूक कशी कराल? या सोप्या ट्रिक्स वाचाच नाहीतर होईल नुकसान!