राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर पालघर, पुणे घाटमाथा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारपासून पावसाचा जोर वाढलेला दिसतो आहे. सलग चार दिवस पाऊस कोसळत असून दररोजची पावसाची सरासरी नोंद ६० मिमीपेक्षा अधिक आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये अधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, रविवारनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
२६ जुलैपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता असून, या भागांमध्ये समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.