मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींना लवकरच मिळणार जुलैचा हप्ता
राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येत्या दोन ते तीन दिवसांत जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिला व बाल विकास विभागाने यासंदर्भात 30 जुलै 2025 रोजी अधिकृत शासन निर्णय जाहीर करत 2984 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
1500 रुपये दरमहा लाभ सुरू
महायुती सरकारने जुलै 2024 पासून ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेद्वारे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा थेट आर्थिक लाभ दिला जातो. जुलै महिन्याचा हप्ता हा या योजनेतील 13 वा हप्ता ठरणार आहे.
मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद
सरकारने या योजनेसाठी एकूण 28,290 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यापैकी जुलै महिन्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निधीच्या वर्गीकरणानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होईल.
अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांचा लाभ जून महिन्यापासून थांबवण्यात आला आहे. जून महिन्यात सुमारे 2 कोटी 25 लाख महिलांना हप्ता वितरित करण्यात आला होता.
खर्चात घट
छाननीनंतर अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आल्यामुळे योजनेसाठी होणाऱ्या मासिक खर्चातही घट होत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्यातील पात्र महिलांना लवकरच जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. शासन निर्णयानंतर प्रत्यक्ष निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लाभार्थींनी आपल्या खात्याची स्थिती लवकरच तपासावी.
टीप: लाभ मिळवण्यासाठी पात्रता निकष आणि आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता केलेली असावी. शंका असल्यास स्थानिक अंगणवाडी केंद्र किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
हे पण वाचा : जनावरांमध्ये लम्पी रोग कसा पसरतो आणि त्यापासून संरक्षण कसे करावे?