दर्जेदार कांदा उत्पादनासाठी असा करा खतांचा वापर
Onion Crop : कांद्याच्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कांद्याचे संतुलित पोषण व्यवस्थापनाबरोबरच सुधारित लागवड तंत्राचा वापर महत्त्वाचा आहे. योग्यवेळी शिफारशीत जातींची योग्य अंतरावर लागवड, योग्यवेळी तण व्यवस्थापन, पीकवाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याचा योग्य वापर, वेळेवर कीड आणि रोग व्यवस्थापन केल्यास कांद्याच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येतं.
सुधारित जाती आणि संतुलित खत व्यवस्थापनाचा अभाव, पीकवाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याचा तुटवडा, कीड, रोगांमुळे होणारे नुकसान आणि सुधारित लागवड तंत्राचा कमी वापर या कारणांमुळे कांद्याच्या उत्पादकता कमी झाली आहे. एकसमान आकाराचे कांदे कमी तर चिंगळी कांद्याचे प्रमाण जास्त. यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नाही. जोड कांदा, डेंगळा कांद्याचे जास्त प्रमाण. साठवणुकीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. त्यामुळे कांदा साठवणुकीत सुद्धा कमी काळ टिकतो. साठवणुकीत २० ते ४० टक्के नुकसान. या सर्व कांदा उत्पादनातील प्रमुख समस्या आहेत.
कांदा पिकाला खते देताना शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा माहिती नसल्याने योग्य प्रमाणात खते दिली जात नाहीत. याशिवाय विविध अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार होत नाही. त्यामुळे अन्नद्रव्यांचे एकसारखे मिश्रण होत नाही आणि हेच मिश्रण पिकाला दिल्यानंतर ते पिकाच्या मुळाजवळ एकसारखे पडत नाही. अशा पोषणतत्त्वांच्या असमान वाटपामुळे पिकाचे संतुलित आणि संपूर्ण पोषण व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे उत्पादन घटते. आणि साठवणुकीतही कांद्याचं मोठे नुकसान होत.
हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांचा योग्य वापर होणं गरजेचं आहे.
१) जमिनीत जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर कमी असेल तर जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची प्रक्रिया मंदावते. जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता आणि पोषणही कमी होते. असंतुलित अन्नद्रव्यांच्या पोषणामुळे पिकाच्या उत्पन्नात घट येते, गुणवत्ता खालावते.
२) लागवड करताना खताचा बेसल डोस देण्यासाठी लागणारी खते योग्य वेळेवर आणि योग्य मात्रेत उपलब्ध करणे गरजेचे आहे. पिकाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये पिकाला चांगली मुळी फुटणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे पिकाचा जमिनीच्यावरील भागाचा विकास चांगला होतो. बेसल डोसमध्ये प्रामुख्याने पिकाच्या मुळांसाठी आवश्यक स्फुरद, नत्र, सूक्ष्म अन्नघटकांचा समावेश असतो. त्यामुळे पिकाची मुळे चांगली फुटतात. त्यामुळे अन्नघटकांचे पोषण चांगल्या प्रकारे होते. पिकाच्या जोमदारवाढीसाठी चांगली चालना मिळते.
त्याचा चांगला परिणाम पिकाच्या पुढील वाढीच्या टप्प्यामध्ये होतो. पिकाची मुळे चांगली वाढलेली असतील तर रोपांची जोमदार वाढ होऊन कांद्याची चांगली वाढ होते. याशिवाय दिलेला बेसल डोस मातीत चांगला मिसळला पाहिजे. बेसल डोस हा लागवडीच्या वेळेस किंवा लागवड झाल्यानंतर जास्तीत जास्त १० ते १५ दिवसांनी दिला पाहिजे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन त्याचा चांगला परिणाम म्हणून एकसमान आकाराचे कांदे मिळतात. अशा प्रकारे कांद्यामध्ये योग्य खत व्यवस्थापनाचं नियोजन केलं तर कांद्याचं भरघोस उत्पादन मिळेल.