लसणाचे दर झेपावले; कापूस, सोयाबीन, मूग, गवारच्या दरांमध्ये काय बदल?
सोयाबीनमध्ये चढ उतार
ब्राझीलमधील सोयाबीनची धिम्या गतीने सुरु असलेली काढणी आणि अर्जेंटीनात मधल्या काळात पावसाने मारलेली दांडी, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.६७ डॉलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते.
देशात मात्र सोयाबीनचा बाजार स्थिर होता. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३५० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे. ही आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
लसूण तेजीतच
देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे. दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे. बाजारातील मर्यादीत आवक आणि चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे.
आजही देशातील बाजारात लसणाला सरासरी २५ हजार ते २८ हजार रुपयांचा भाव मिळाला. गुणवत्तापूर्ण लसणाचा भाव २८ हजारांच्या पुढे दिसत आहे. बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
गवारचे भाव टिकून
गवारच्या भावात काहीसे चढ उतार पाहायला मिळाले असले तरी सरासरी दरपातळी कायम दिसत आहे. बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे गवारला मागील काही महिन्यांपासून तेजीतच दिसत आहेत.
बाजारातील आवक आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच काहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज आहे.
मुगाचा बाजार दबावात
देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे.
देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दबावातच
कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला कमी उठाव आहे. त्यामुळे बाजारभाव दबावात आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारावर दिसत आहेत. तसेच देशात सध्या कापसाची आवकही चांगली सुरु आहे. त्यामुळे देशात चांगली मागणी असूनही कापसाचे भाव दबावात आहेत. काल देशातील बाजारात कापसाची १ लाख ५३ हजार गाठींची आवक झाली होती.
तर देशातील बाजारात कापसाचा भाव आजही सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होता. तर सरकी ३ हजार ४०० ते ३ हजार ६०० रुपायंच्या दरम्यान विकली जात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आज दुपारपर्यंत ६७.१९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचला होता. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
हे पण वाचा : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी असा करा खतांचा वापर