yellow-pea-import: हरभऱ्याच्या दरावर संकट! पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला मिळाली मुदतवाढ

yellow-pea-import: हरभऱ्याच्या दरावर संकट! पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला मिळाली मुदतवाढ

yellow-pea-import: हरभऱ्याच्या दरावर संकट! पिवळ्या वाटाण्याच्या आयातीला मिळाली मुदतवाढ

 

हरभरा उत्पादकांना अडचणीत आणणाऱ्या पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला केंद्र सरकारने ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या काळात आणखी ४ ते ५ लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे बाजारात आता शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची आवक आणि पिवळा वाटाणा आयात यामुळे दबाव वाढण्याची शक्यता आहे. बाजारात आवकेचा दबाव असेपर्यंत हरभरा हमीभावापेक्षा कमी दरात विकला जाऊ शकतो, असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने पिवळा वाटाण्याची मुक्त आयातीला ३१ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगाने याविषयी अधिसूचना काढली आहे. म्हणजेच पिवळा वाटाणा आयातीवर कोणत्याही प्रकारचे किमान आयात मूल्य किंवा आयात शुल्क लागणार नाही. तसेच आयात कोटाही नसेल. मात्र आयात करताना इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टमवर त्याची नोंद करावी लागेल.

३१ मे २०२५ पर्यंत आयातीसाठी जहाजांमध्ये माल भरलेल्या मालाची आयात मुक्त असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. वाटाण्याची मुक्त आयात यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत होती. आता मुदतवाढ मिळाल्याने आयातदारांना जवळपास ३ महिने मुक्त आयात करता येईल.
मागील वर्षभर वाटाण्याच्या मुक्त आयातीमुळे हरभरा आणि तुरीचे भाव कमी होण्यास मदत झाली.

हरभऱ्याचा भाव मोठ्या प्रमाणात तुटला होता. आता तर हरभऱ्याचे भाव हमीभावाच्या खाली आले आहेत. तूरही हमीभावाच्या खाली विकली जात आहे. त्यामुळे सरकारने पिवळा वाटाणा, उडीद आणि तुरीची मुक्त आयात बंद करावी, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांकडूनही केली जात होती. कारण त्याशिवाय देशातील शेतकऱ्यांना दर मिळणार नाही आणि उत्पादनही वाढणार नाही. सरकारच्या धोरणामुळे केवळ शेतकरीच नाही तर व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगही अडचणीत आले आहेत.

पिवळा वाटाणाआयात वाढणार
दिल्ली येथील आयग्रेन इंडियाचे संचालक आणि बाजार विश्लेषक राहुल चौहान यांनी सांगितले, की आयातीला मुदतवाढ मिळाल्याने ३१ मेपर्यंत आणखी ४ ते ५ लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकते. भारताला कॅनडातून मोठ्या प्रमाणात आयात होईल. तसेच रशिया, टर्की, युक्रेन, लिथुआनिया, लॅटविया आदी देशांमधूनही आयात होऊ शकते.

चीनकडून कॅनडाच्या वाटाण्यावर १०० टक्के शुल्क
चीनने नुकतेच कॅनडामधून आयात होणाऱ्या पिवळा वाटाण्यावर १०० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे कॅनडाचा चीनकडे जाणारा पिवळा वाटणा भारतात येऊ शकतो. कारण नेमके याच काळात भारताने मुदतवाढ दिली आहे. तसेच कॅनडा पिवळा वाटाण्याचा आघाडीचा निर्यातदार आहे. शेजारच्या चीनमध्ये १०० टक्के शुल्क आणि भारतात कोणतेही शुल्क नाही त्यामुळे चीनला जाणारा माल भारतात येईल, असे अभ्यासकांनी सांगितले.

हरभऱ्यावर दबाव
पिवळा वाटाणा हरभऱ्याला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे हरभऱ्याचे भाव पडले आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांचा माल बाजारात येत आहे. आवकेचा दबाव वाढत आहे. आता त्यातच पिवळा वाटाणाही आयात होणार आहे. म्हणजेच हरभरा बाजारावर आता शेतकऱ्यांच्या मालाची आवक आणि पिवळा वाटाण्याची आयात याचा दबाव असणार आहे. हरभऱ्याला सरकारने यंदा ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. आयातीमुळे आवकेचा दबाव असेपर्यंत बाजार हमीभावाच्या खालीच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.yellow-pea-import

उडीद आयातीला एक वर्षाची मुदतवाढ केंद्र सरकारने उडदाच्या मुक्त आयतीला ए वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत भारतात कोणत्याही बंधनाशिवाय उडीद आयात होणार आहे. मुक्त आयातीची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत असताना सरकारने मुदतवाढ दिली आहे. उडदाचे भाव आधीच कमी आहेत. उडदाला यंदा ७ हजार ४०० रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला. तर बाजारात ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान उडदाला भाव मिळत आहे.yellow-pea-import

हे पण वाचा : शेतीतील तण नियंत्रणासाठी हे 5 सरकारी उपाय करून पहा – हमखास यश!

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top