31 डिसेंबरला देशात हवामानाचा दुहेरी प्रभाव : उत्तर भारतात पावसाचा इशारा, महाराष्ट्रात थंडीचा जोर

31 डिसेंबरला देशात हवामानाचा दुहेरी प्रभाव

31 डिसेंबरला देशात हवामानाचा दुहेरी प्रभाव : उत्तर भारतात पावसाचा इशारा, महाराष्ट्रात थंडीचा जोर

डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत देशातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) 31 डिसेंबर 2025 रोजी उत्तर भारतातील काही राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, त्याचवेळी महाराष्ट्रात थंडीची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र आहे.


उत्तर भारतात पावसाचा अलर्ट

IMD च्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून पुढील 24 तासांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग वाढण्याची आणि थंडी अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्षअखेरीस होणारा हा पाऊस जनजीवनावर परिणाम करू शकतो.


दक्षिण भारतातही पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळ या भागांमध्ये 28 ते 31 डिसेंबरदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सतत ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महाराष्ट्रात थंडीचा प्रकोप वाढला

उत्तर भारतातील तीव्र गारठ्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले गेले आहे.
परभणी, निफाड, धुळे, अहिल्यानगर, नागपूर, नाशिक, भंडारा आणि यवतमाळ या भागांमध्ये थंडीचा चांगलाच जोर जाणवत आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात कडाक्याची थंडी कायम राहण्याचा इशारा दिला असून, काही ठिकाणी कोल्ड वेव्हसारखी स्थिती निर्माण होऊ शकते.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

थंडी वाढत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विशेषतः गहू, हरभरा आणि कांदा रोपे यांवर दंवाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी रात्री हलकी सिंचन करणे, गरज असल्यास धूर पद्धतीचा वापर करणे आणि पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच थंडी लक्षात घेऊन शेतीकामाचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.


अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा

हवामान परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी IMD च्या अधिकृत इशाऱ्यांकडे आणि जिल्हानिहाय हवामान अंदाजाकडे नियमित लक्ष देणे आवश्यक आहे. “मौसम” अ‍ॅप किंवा IMD च्या वेबसाइटवरून ताज्या माहितीस प्राधान्य द्यावे.


हे पण वाचा IS 19262:2025 : शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या चाचणीसाठी भारताने जाहीर केलं नवं मानक

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top