ट्रॉम्बे कोकण महान’ : पाणथळ भात शेतीसाठी नवी उच्च उत्पादक जात
ट्रॉम्बे कोकण महान:महाराष्ट्रातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘ट्रॉम्बे कोकण महान’ ही नवीन भाताची जात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पाणथळ भात क्षेत्रासाठी लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक उत्पादन, उत्तम तांदूळ गुणवत्ता आणि चांगले स्वयंपाकी गुणधर्म यामुळे ही जात भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी ठरू शकते.
संयुक्त संशोधनातून विकसित झालेली नवी जात
ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आणि भाभा अणू संशोधन केंद्र (BARC), ट्रॉम्बे यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय वाण निवड समिती व संयुक्त संशोधन समितीने या जातीच्या प्रसारणाला मान्यता दिली असून राष्ट्रीय अधिसूचनेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये मर्यादित प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार आहे.
जातीची उत्पत्ती व वाढीची वैशिष्ट्ये
‘ट्रॉम्बे कोकण महान’ ही जात पुसा बासमती × रत्नागिरी-२४ या दोन सुधारित वाणांच्या संकरणातून विकसित करण्यात आली आहे.
-
जात प्रकार : गरवी
-
वाढीचा कालावधी : १४० ते १४५ दिवस
-
सरासरी उंची : १०५ ते ११० सेंमी
पाण्याचा निचरा कमी असलेल्या जमिनीतही ही जात जोमाने वाढते.
उत्पादन क्षमता आणि लागवडीचे क्षेत्र
या भात जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ५५ क्विंटल प्रति हेक्टर असून, योग्य शेती व्यवस्थापन केल्यास १०० क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळू शकते.
कृषी तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्रातील सुमारे २० टक्के पाणथळ भात क्षेत्रासाठी ही जात विशेष फायदेशीर ठरू शकते.
धान्य व तांदळाची उत्कृष्ट गुणवत्ता
या जातीचा दाणा लांबट व बारीक असून तांदळाचा दर्जा उच्च आहे.
-
भरडाईचे प्रमाण : ६९.५५%
-
अखंड तांदळाचे प्रमाण : ६१.२५%
तांदूळ चकचकीत असून पिटुळपणा नसल्यामुळे बाजारात याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
स्वयंपाकी गुणधर्म
या तांदळातील अमायलोजचे प्रमाण २४.८% (मध्यम) असल्यामुळे भात शिजवल्यानंतर मोकळा व न चिकट राहतो. त्यामुळे घरगुती वापरासोबतच हॉटेल, कॅन्टीन व व्यापारी वापरासाठीही ही जात उपयुक्त आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘ट्रॉम्बे कोकण महान’ का फायदेशीर?
-
पाणथळ जमिनीसाठी अनुकूल
-
जास्त उत्पादन देणारी जात
-
दर्जेदार व बाजारपेठेत मागणी असलेला तांदूळ
-
मोकळा शिजणारा भात
-
कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भासाठी योग्य












